श्रावणी सोमवार अन नागपंचमीचा दुहेरी योग महादेव मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): नागपंचमीचा सण आणि श्रावणातील पहिला सोमवार असा दुहेरी योग आल्याने शहरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सकाळपासूनच शहरातील विविध महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. विशेषतः महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. मंदिर परिसरात हर हर महादेव, ओम नमः शिवायच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.

श्रावण महिन्यातील सोमवार हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. त्यातच यंदा श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्याने भाविकांच्या उत्साहात आणखी भर पडली. पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरांकडे धाव घेत भगवान महादेवाचे दर्शन घेतले. अनेकांनी शिवलिंगावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक करून बेलपत्र, फुले आणि विविध पूजासाहित्य अर्पण केले. महिलांनी नागपंचमीच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करून पारंपरिकतेचे दर्शन घडविले. अनेक महिलांनी सकाळी लवकर उठून घरातील देवघरात पूजा केल्यानंतर महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. नागदेवतेची पूजा करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी दोन्ही एकाच दिवशी आलेला योग भाविकांसाठी विशेष ठरला. त्यामुळे सकाळपासून सुरू झालेली मंदिरांमधील गर्दी दुपारपर्यंत कायम होती. या दुहेरी पर्वामुळे शहरात धार्मिक उत्साहाला उधाण आले असून, सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले.

हर हर महादेव च्या गजराने भक्तीमय झाले मंदिरे
शहरातील महादेव मंदिरांमध्ये भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरांमध्ये सकाळपासून अभिषेक, आरती आणि पूजाविधी पार पडला. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या वाढत असल्याने काही मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतही धार्मिक साहित्याची मोठी मागणी दिसून आली. पूजेसाठी लागणारी फुले, बेलपत्र, दूध, फळे, नारळ तसेच विविध पूजासाहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. महिलांनी नागपंचमीसाठी आवश्यक साहित्याची खरेदी केली. त्यामुळे मंदिर परिसरासह बाजारपेठांमध्येही सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी संपूर्ण शहर ओम नमः शिवायचा अखंड गजर, भोलेनाथ की जय, हर हर महादेवच्या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले.